गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील किटवाड येथे लघुपाटबंधारे धरणाच्या धबधब्याच्या ठिकाणी खोल खड्ड्यात पडून बेळगाव येथील चार महाविद्यालयीन तरुणींचा जागीच मृत्यू झाला असून, एका तरुणीला वाचवण्यात किटवाड येथील तीन तरुणांना यश आले आहे. ही घटना आज (शनिवारी) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

बेळगावमधील आशिया मुजावर (वय १७, उज्ज्वलनगर), कुदासिया हासम पटेल (वय २० रा. अनगोळ), रुक्षार बिस्ती, तस्मिया (वय २०, रा. झटपट कॉलनी) अशी बुडून मरण पावलेल्या चार तरुणींची नावे आहेत. बेळगाव येथील उज्ज्वलनगर, अनगोळसह विविध भागातील ४० हून अधिक तरुणींचा गट विकेंड साजरा करण्यासाठी किटवाड धबधबा येथे फिरण्यासाठी आला होता. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची चंदगड पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

किटवाड येथे लघुपाटबंधारे विभागाची दोन धरण असून, ही घटना एक क्रमांकाच्या धरणावर घडली. या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडून पुढे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे तयार झालेल्या सुमारे १२ फूट खोल खड्ड्यात या तरुणी आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने दुसरी तिला वाचवण्यासाठी गेली. त्यानंतर तिसरी वाचवण्यासाठी गेली, त्यानंतर चौथी असे करत एकापाठोपाठ पाच तरुणी त्या पाण्याच्या खड्ड्यात पडल्या आणि पाचही बुडाल्या.

यावेळी खोल खड्ड्यात उडी मारून किटवाड येथील महेश हेब्बाळकर, विजय लाड, आकाश पाटील यांनी पाचही तरुणींना बाहेर काढले. यामधील चारजणींचा जागीच मृत्यू झाला, तर एकीची प्रकृती गंभीर आहे. तिला उपचारासाठी बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.