कोल्हापूर (प्रतीनिशी) : संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ रिंग रोडवर आज (शनिवार) सकाळी आयसोलेशन हॉस्पिटलसमोर भरधाव आलिशान कारने महापालिकेच्या आरोग्य विभागातील चार कर्मचाऱ्याना ठोकरले. यामध्ये तीन महिलांचा समावेश असून, सर्व जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

विनायक लहू कांबळे (वय ४०, सुभाषनगर), वंदना संजय भालकर (वय ४५, वारे वसाहत), राजक्का विलास घेवदे (वय ५२, भारतनगर), अर्चना अशोक सोळाकुंरे (वय ३५, बिजली चौक जवाहरनगर) अशी जखमींची नावे आहेत. यापैकी विनायक कांबळे यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

महावेश सुरेश ओसवाल असे कार चालकाचे नाव आहे. संभाजीनगर ते शिवाजी विद्यापीठ रिंग रोड मार्गावर भरधाव वेगाने जात जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि कार रस्ता दुभाजकावर जोरात आदळली. दुभाजकावरील झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्याचे, खरमाती काढण्याचे काम करणाऱ्या महापालिकेच्या चौघा कर्मचाऱ्याना या कारने ठोकरले. यामध्ये जखमी राजक्का घेवदे यांच्या हाताची बोटे तुटली, तर अन्य तिघांच्या डोक्याला व हातपायाला गंभीर दुखापत झाली आहे. चौघांनाही तत्काळ रुग्णालयात दाखल केले आहे.  राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक ईश्वर ओमासे, सपोनि भगवान शिंदे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.