कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथे २२ फेब्रुवारी २०१० रोजी शेत जमिनीच्या वादातून झालेल्या माराहणीत इलाई उमर जमादार (वय ६०) असे यामध्ये मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.  या खूनप्रकरणी आज (मंगळवार) जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.जी.भोसले यांनी चार आरोपींना सात वर्षे सक्तमजुरी आणि ३ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

यामध्ये लियाकत युसुफ जमादार (वय ३५), रियाज युसूफ जमादार (२७), यूसफ उमर जमादार (६५) हे सर्व (रा. हेर्ले ता.हातकणंगले) आणि बापू परशुराम लोंढे (वय ३८, रा.वडगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. याकामी विशेष सरकारी वकील म्हणून अँड. सुभाष भट यांनी काम पाहिले. तर याच प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये शेतातील कापलेला शाळू नेण्यास अटकाव करताना फिर्यादी रियाज जमादार यांच्या वडीलांना लाथाबुक्यानी माराहण करून जखमी केल्याप्रकरणी तिघांना एक वर्ष सक्तमजुरी आणि ६,५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. यामध्ये फिरोज इलाही जमादार, खुदीजाबी इलाही जमादार आणि सालीया फिरोज जमादार अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर याकामी सरकारी वकील म्हणून अँड. शितल रोटे यांनी काम पाहिले.

हेर्ले इथे शेत जमीनीच्या मालकीवरुन आरोपी आणि मयत व्यक्ती यांच्यामध्ये वाद होता. २२ फेब्रुवारी २०१० रोजी पुन्हा यांच्यामध्ये वाद झाला. यामध्ये आरोपींनी मयत इलाईला काठ्याकुऱ्हाडीने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची पत्नी, मुलागा आणि सुनेलाही मारहाण झाल्याने ते ही जखमी झाले होते. याप्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  होता.

न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या खटल्यात प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या मयत व्यक्तीचा मुलगा फिरोज, पत्नी खुदीजाबी आणि सुन सालीया जमादार यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. परस्परविरोधी गुन्ह्यातील खटल्यात एकूण ९ साक्षी तपासण्यात आल्या.