गारगोटी (प्रतिनिधी) : लॉकडाऊनच्या काळात अवैध मद्य विकणाऱ्यांवर आता पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास भुदरगड तालुक्यातील मेघोली येथे अवैध मद्याची तस्करी करताना पोलिसांनी सुमारे दिड लाखांची गोवा बनावटीची दारू, टेम्पो असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर तानाजी दत्तू पाटील (वय ४१, रा. मौजे मेघोली, ता. भुदरगड) याला पोलीसांनी अटक केली आहे.

भुदरगड तालुक्यातील तानाजी पाटील हा आजरा, नवले, मेघोली या दुर्गम भागातील रस्त्याने गोवा बनावटीची विदेशी मद्याची तस्करी करीत असल्याची बातमी पोलीसांना मिळाली होती. यानुसार आज पहाटे मौजे नवले धनगर वाडा येथील रस्त्यावर पोलीसांनी सापळा रचला. यावेळी रस्त्यावरून जाणारा मारुती सुझुकी कंपनीचा टेम्पो क्र.(एम. एच. ०९ एफ.एल.) हा पोलीसांनी अडवून त्याची तपासणी केली असता यामध्ये ६० बॉक्स गोवा बनावटीची विदेशी मद्य सापडले. यावेळी पोलीसांनी टेम्पोसहीत चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर, पोलीस नाईक संदेश कांबळे, पोलीस शिपाई भांदीगरे, किरण पाटील,  पोलीस शिपाई चालक मेटकर यांनी केली.