अन् चार मुले आईच्या मायेला झाली पोरकी

0
147

बेळगाव (प्रतिनिधी) : अनैतिक संबंधाच्या संशयावरून नवऱ्याने बायकोचा खून केल्याची घटना घडली आहे. बेळगावातील ऑटोनगर येथे ही घटना घडली. पत्नीचा चाकूने भोसकून खून करणारा पती स्वत:हून पोलिस स्थानकात हजर झाला. सखुबाई पुंडलिक लमाणी (वय 32, रा. रामापूर तांडा, सध्या रा. ऑटोनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. यांची तीन मुली व एक मुलगा आईविना पोरका झाला आहे. याप्रकरणी पती पुंडलिक लमाणी याला अटक करण्यात आली आहे. मृत सखुबाईच्या भावाकडून माळमारुती पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सखुबाई व पती पुंडलिक यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासूनपासून वाद सुरू होते. पुंडलिकला सखुबाईच्या चारित्र्याबद्दल संशय होता. दोघांमध्ये वारंवार वादावादाच्या घटना घडत होत्या. पुंडलिक हा रिक्षाचालक आहे. दोघांत कडाक्याचे भांडण झाले. यावेळी वाद विकोपाला जाऊन पुंडलिकने सखुबाईवर चाकूने वार केले. वार वर्मी लागल्याने ती तेथेच कोसळली. अधिक रक्तस्राव होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पुंडलिकने स्वत:हून पोलिस स्थानकात हजर होऊन पत्नीचा खून केल्याचे सांगितले.