इचलकरंजी  (प्रतिनिधी) :शहरालगतच्या कोरोची येथे महिलेची छेड काढल्याच्या कारणावरून कोयत्याने व विळाने चौघांना मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

इचलकरंजी शहरालगतच्या कोरोची येथे सुनीता माने व शुभम माने हे एकाच गल्लीत रोहिदास मंदिर मागे गावभाग या ठिकाणी राहतात. आपल्या सुनेची छेड काढल्याच्या कारणावरून यापूर्वी सुनीता माने व शुभम माने यांच्यात वाद झाला होता. रात्री विकी हा घरासमोर थांबला होता. याचवेळी संशयित आरोपी शुभम माने, रमेश माने, प्रथमेश माने, रितेश माने, योगीराज माने व एका अल्पवयीन मुलाने विकी याला जीवे मारण्याच्या उद्देशाने विळ्याने विकीच्या डोक्यात व पोटावर वार केले. रमेश याने ही कोयत्याने वार केले. यावेळी सुनीता या अडवण्यासाठी आले असता प्रथमेश  व अल्पवयीन मुलाने सुनीता यांच्या हातावर व तोंडावर विळ्याने वार करून जखमी केले.

तसेच अशोक माने व शेजारी राहणारे संजय माने हे भांडणे सोडवण्यासाठी आले असता रितेश व योगीराज यांनी अशोक यांच्या डोक्यात तर संजय यांच्या हातावर वार करून जखमी केल्याचे शहापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. जखमींवर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची तक्रार सुनीता माने यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली असून, त्यानुसार पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर कोरोची येथील गावभाग या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.