आजरा (प्रतिनिधी) : पंजाबमध्ये जमीन खरेदी-विक्री व्यवसायातून झालेल्या वादादरम्यान एका कार्यालयावर हल्ला करीत एका व्यक्तीवर बंदुकीने गोळ्या घालणाऱ्या आणि सुमारे एक कोटी रुपयांचा दरोडा टाकलेल्या टोळीमधील चौघा जणांना आजरा पोलिसांनी धाडसाने पकडले. हे चौघे आरोपी एका अलिशान गाडीमधून गोव्याला पळून जात असताना रविवारी ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईनंतर संबंधित चौघांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या धाडसाचे कौतुक करीत जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आजरा पोलिसांना दहा हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर केले.

पंजाब राज्यामधील डेराबसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी जमीन खरेदी-विक्री करणाऱ्या एका कार्यालयावर दरोडा पडला होता. यामध्ये काही संशयितांनी गोळीबार करुन एका व्यक्तीला गंभीर जखमी केले आणि कोट्यवधींचा दरोडा टाकून तेथून पोबारा केला होता. संबंधितांचा माग काढीत पंजाब पोलिस या संशयितांच्या पाठलाग करीत होते. या गुन्ह्यातील संशयित पांढऱ्या रंगाच्या कोरोला कारमधून गोव्याकडे निघाल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळाली होती.

पुणे-बेंगळुरु मार्गावरुन कोल्हापूर मार्गे ते सर्वजण गोव्याकडे निघाले असताना त्यांना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण दल तयार झाले होते. या खतरनाक दरोडेखोरांकडे काही हत्यारे असण्याची शक्यता व्यक्त होती. पोलिस अधीक्षक बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हाचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी या मार्गावरील कागलनजीकच्या कोगनोळी टोल नाक्यावर नाकाबंदी करण्याच्या सूचना कागलचे पोलिस निरीक्षक जाधव यांना दिल्या. पोलिस निरीक्षक गोर्ले आणि सहायक पोलिस किरण भोसले कोगनोळी टोल नाक्यावर पोहोचले; मात्र संशयितांनी दरम्यानच्या कालावधीत कोगनोळी नाका ओलांडला असल्याचे समजले.

आजरा येथील सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांना सूचना करण्यात आल्या. याबाबतची माहिती मिळताच आजरा पोलिसांचे पथक येथील मुमेवाडी फाट्यावर पोहोचले व नाकाबंदी सुरू केली. संशयित पळून जात असलेल्या कारच्या वर्णनावरून ती कार अडवली गेली आणि धाडसाने सर्व संशयितांवर झडप टाकून त्यांना ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत अभय प्रदीप सिंग, आर्य नरेश जगलान, महिपाल बलजित झगलान (सर्वांचे वय २०) आहे. सनी कृष्णा जगलान (वय १९, जि. पानिपत, हरियाणा) या चौघांना ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पंजाब राज्यातील डेराबसी पोलिस ठाण्याचे अधिकारी जयकमल शेखो यांच्याकडे त्यांचा ताबा देण्यात आला. या धाडसी कारवाईत आजऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक हारुगडे, सहायक फौजदार बिराप्पा कोचरगी, राजेश आंबुलकर, निरंजन जाधव, अमोल पाटील यांचा सहभाग होता.