कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात बनावट नावाचा वापर करून १ कोटीचे कर्ज देण्याच्या बहाण्याने २० लाखांचा गंडा घालणाऱ्या चौघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. शिवाजी लक्ष्मण शेळके (वय ४६), संदीप ज्ञानदेव लाड (३२),  राजू शिवाजी मिसाळ (३८, सर्व रा. सातार्डे ता. पन्हाळा) आणि भिमराव मारुती लाड (५४, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर, मूळ गाव केर्ले, ता. करवीर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पंधरा लाख नऊ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

फिर्यादी अनिल विश्वासराव पाटील (रा. येळावी, ता. तासगाव) हे शेती व केमिकल ऑईल पुरविण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना पैशाची आवश्यकता होती. त्यामुळे मोठ्या रक्कमेच्या कर्जाची आवश्यकता असणारे शोधून त्यांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीतील बसवराज पाटील (रा. दुधगाव) व विजय पाटील (रा. सावंतवाडी) अशी बनावट नावे सांगून फसवणूक करणाऱ्या म्होरक्यांना याची माहिती मिळताच फिर्यादी अनिल पाटील यांना १ कोटी रुपयांचे कर्ज देतो असे सांगितले. कर्जापोटी सुरुवातीला २० लाखांचे डिपॉझिट म्हणून द्यावे लागेल अशी अट घातली.

त्याप्रमाणे आरोपींनी ४ मार्च २०२१ रोजी सकाळी अनिल पाटील यास सांगलीहून तावडे हॉटेल कोल्हापूर येथे बोलावून घेतले. त्या टोळीतील दोन साथीदार हे डमी पोलीस बनून अनिल पाटील यांच्याकडील २० लाखांची रक्कम असलेली बॅग बसवराज पाटील याने आपल्याकडे घेवून साथीदारासह पळ काढला. त्यामुळे याबाबत अनिल पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

पोलिसांना तांत्रिक माहितीच्या आधारे सदर टोळीतील बसवराज पाटील या व्यक्तीचे खरे नाव शिवाजी लक्ष्मण शेळके (रा.सातार्डे ) असल्याचे समजले. त्यानंतर सपोनि परशुराम कोरके व त्यांच्या पथकाने वेशांतर करून सातार्डे येथे रात्रभर सापळा रचून आरोपी शेळके घरी येताच त्याला ताब्यात घेतले. त्याला पोलीसी खाक्या दाखवताच शिवाजी शेळके याने गुन्ह्याची कबुली देवून इतर साथीदारांची माहिती सांगितली. त्याप्रमाणे इतर तिघा आरोपींना अटक करण्यात आली.

पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सपोनि परशुराम कोरके, दिग्विजय चौगले, अनिल पाटील, दिगंबर पाटील, शुभम संकपाळ, सुशील सावंत, जगदीश बामनीकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.