कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर फाउंड्री आणि इंजिनिअरिंग प्लास्टरच्यावतीने शिरोली, गोकुळ शिरगावमधील वेस्ट सँड रिक्लेमेशन प्लांट अतिशय उत्तम प्रकारे कार्यान्वित आहेत. या वाळूची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच या  प्रकल्पांची क्षमता दुप्पट करण्यासाठी केंद्र शासनाकडे  पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही खासदार  संजय मंडलिक यांनी दिली.

खा. संजय मंडलिक यांनी अल्पावधीमध्ये उद्योग वाढीसाठी केलेल्या योगदानाबद्दल स्मॅक-शिरोलीचे अध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते  त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खा. मंडलिक म्हणाले की,  स्मॅकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कौशल्य विकास अंतर्गत केंद्र शासनाच्या योजना मंजूर करण्याकरिता सर्वतोपरी साहाय्य केले जाईल.  राज्य कामगार विमा योजनेचा दवाखाना कामगारांच्या सोयीकरीता स्मॅकच्या इमारतीमध्ये सुरु होण्याकरीता  सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

यावेळी  उपाध्यक्ष दीपक पाटील, आयटीआय चेअरमन राजू पाटील,  क्लस्टर चेअरमन निरज झंवर,  कोल्हापूर फाउंड्री इंजिनिअरिंग क्लस्टर चेअरमन सचिन पाटील,  चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विज्ञानंद मुंढे, शिरोली मॅन्यफॅक्चर असोसिएशनचे  संचालक दीपक पाटील,  एम. वाय. पाटील,  अमर जाधव, प्रशांत शेळके, जयदत्त जोशिलकर,  आदी उपस्थित होते.