फॉर्च्युनर कार ट्रॅक्टर ट्रेलरमध्ये घुसली : ३ जण जागीच ठार

0
67

पुणे (प्रतिनिधी) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवणजवळ भरधाव फॉर्च्युनर कारने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रेलरला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात लातूर येथील ३ जण जागीच ठार झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी मध्यरात्री झाला.

मृत व जखमी हे एकाच कुटुंबातील असून गीता अरुण माने (वय ३६) मुकुंद अरुण माने (२५) व अरुण बाबूराव माने (४५ तिघे रा. लातूर जि. लातूर) अशी  मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर साक्षी अरुण माने (वय१८), महादेव रखमाजी नेटके (५६ रा.लातुर) हे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रॅक्टर (एम.एच.४५ एफ.७७७९) पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघाला होता. डाळज नं. २ येथे त्याच दिशेने फॉर्च्युनर कार (एम.एच.२४ एटी.२००४) भरधाव वेगाने येऊन ट्रेलरला पाठीमागून धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. जखमींना भिगवण व पुणे येथील रूग्णालयात दाखल केले आहे.