मुंबई  (प्रतिनिधी) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे आज (मंगळवारी)  पहाटे रूग्णालयात  उपचार सुरू असताना निधन झाले.  त्यांना हृदयविकाराचा  झटका आला. करड्या शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.

सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण वाईमध्ये झाले. त्यांचे शिक्षण एमएससीपर्यंत झाले होते.  रायगडला शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर ते १९७३ मध्ये आयपीएस अधिकारी झाले.  

धुळे, वर्धा, अहमदनगर, पुणे येथे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले.  कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते. पुण्याचे आयुक्त, मुंबईच्या आयुक्तपदाची धुरा त्यांनी सांभाळली.  त्यांच्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत  मुंबईतील गुन्हेगारीचा आलेख खाली आला होता. त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केले होते. त्याच वर्षी पोलीस महासंचालकांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला होता.