पुणे (प्रतिनिधी) : माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने पुण्यातील राहत्या घरी आज (सोमवार) सकाळी साडे नऊ वाजता निधन झाले. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पी.बी. सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी मुंबई हायकोर्ट, सुप्रीम हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिले. १९८९ ते १९९५ या काळात सुप्रीम कोर्टात ते न्यायमूर्ती होते. १९९५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यक्रमांमध्ये गुंतवून घेतले. वर्ल्ड प्रेस काऊन्सिल आणि प्रेस काऊन्सिल ऑफ़ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काही काळ काम पाहिले. तसेच त्यांनी लोकशासन आंदोलन पार्टीचे संस्थापक म्हणून काम पाहिले होते. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील पहिली एल्गार परिषद घेण्यात आली होती. मराठा समाजाच्या  आरक्षणासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचेदेखील ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. गोध्रा दंगलीप्रकरणी स्थापन केलेल्या तीन सदस्यीय ट्रिब्युनलचे ते सदस्य होते.