मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुक्त झाले आहेत. आज (बुधवार) काही वेळापूर्वीच त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादनही केलं. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि माजी मंत्री गिरीश महाजनही होते.

सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढचे १० दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या ‘सागर’ या शासकीय बंगल्यावर होम क्वारंटाइन असणार आहेत. फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्याने त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही ९३ पर्यंत खाली आल्याने मागील आठवड्यात त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९७ पर्यंत वाढली. रविवारी आणि सोमवारी फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचे डोसही देण्यात आले होते असंही डॉ. खोब्रागडे यांनी सांगितलं.