माजी सीईओ अमन मित्तल यांची जिल्हा परिषदेतील कारकीर्द वादग्रस्त..?

0
249

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील दोन दिवसांपासून जिल्हा परिषद कोल्हापूरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केलेल्या संगणक खरेदीवरून जोरदार वादंग सुरु आहे. १ कोटी ४८ लाख रुपयांची १६७ संगणक, प्रिंटरची कोणालाही विश्वासात न घेता केलेली खरेदी सदस्यांना भलतीच झोंबली आहे. त्याचे पडसाद जलव्यवस्थापन आणि स्थायी समितीच्या बैठकीत दिसून आले. त्यामुळे कालच्या स्थायीच्या बैठकीत राज्याच्या प्रधान सचिवाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा ठराव संमत करण्यात आला. मित्तल यांची कोल्हापूरमधील एकंदरीत कारकीर्द ही वादग्रस्त राहिल्याची चर्चा आहे.

राज्यात आणि जि. प. काळात भाजपच्या सत्ताकाळात त्या वेळच्या कोल्हापुरातील एका वजनदार मंत्र्यांनी त्यांना विश्वासाने कोल्हापुरात आणल्याचे म्हटले जाते. पण जि. प. मध्ये सत्तापालट झाल्यानंतरच्या काळात मात्र  मित्तल यांना सत्ताधाऱ्यांनी कधीही विश्वासात घेतले नाही. तर दुसऱ्या बाजूला त्यांना कोल्हापुरात आणणाऱ्या विरोधकांबरोबर त्यांचे कधी पटले नाही. त्यामुळे मित्तल यांची मोठीच पंचाईत झाली. त्यांच्या येथील कारकीर्दीच्या शेवटच्या काळात कायद्यांचा आधार घेत कोणालाही विश्वासात न घेता ‘एकला चलो रे’ करत निर्णय घ्यावे लागले. हेच निर्णय जिल्हा परिषदेमधील सर्वांना खटकले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तीन कोटीपर्यंत स्व-निर्णय घ्यायची कायद्यात तरतूद आहे असे म्हटले जाते.

मितल यांच्या कारकीर्दीत चर्चेत आलेले घोटाळे….

वॉटर एटीएम घोटाळा, शिक्षक बदल्यांचा घोटाळा, कोविडमधील खरेदी घोटाळा, आगाऊ वेतन वाढीचा विषय अशा अनेक घोटाळ्यांची मालिका यांच्याच काळात घडली असे सांगितले जाते. अनेक अधिकाऱ्यांना आणि सदस्यांना फक्त आश्वासने देऊन वेळ मारून न्यायची कला त्यांच्यामध्ये  असल्याचेही बोलले जाते. आता यातील खरे-खोटेपणा हा चौकशी केल्यावरच समजेल.

काल झालेल्या स्थायी समितीच्या सभेत संगणक खरेदीवरून खूप मोठी खडाजंगी झाली. पाणीपुरवठा विभागाला फक्त पाचच संगणकांची गरज असताना तसेच अध्यक्ष, उपाध्यक्ष अथवा संबंधित समितीला विश्वासात न घेता, कोणत्याही सभेत ठराव पास न करता १६७ संगणकांसह प्रिंटरची खरेदी कशासाठी, हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. राज्याच्या प्रधान सचिवाकडून या प्रकरणाची चौकशी करावी असा ठराव करण्यात आला. एकंदरीत मित्तल यांची कारकीर्द मात्र वादग्रस्त राहिल्याची चर्चा जिल्ह्यात होत आहे.