पुण्यातील भाजपचे माजी खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर..?  

0
190

पुणे (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  भाजपचे सहयोगी सदस्य व माजी खासदार संजय काकडे यांनी लिहिलेला लेख वृत्तपत्रातून छापून आला आहे. त्यामुळे काकडे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. काकडे यांचा प्रवेश पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी महिन्यांत होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या चर्चांना राष्ट्रवादीच्या गोटातून पुष्टी मिळत आहे. मात्र, काकडे यांनी या चर्चा निराधार असल्याचे म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी काकडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर भाजपमध्ये अडगळीत पडलेले काकडे अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे यांना राष्ट्रवादीत घेण्यास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी काकडे यांची मोठी मदत होऊ शकते. दरम्यान, काकडे खरेच राष्ट्रवादीत प्रवेश करणार की, याबाबतची चर्चा हवेतच विरून जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.