कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ-सावर्डे येथील सिद्धकला हायस्कूलमधील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा पन्हाळगड किल्ला भेटीसह वनभोजन कार्यक्रम उत्साहात झाला.

या विद्यालयामार्फत मसाई पठार येथे वनभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेतला. मसाई पठारावरील ऐतिहासिक पांडव लेणी व गुहा दाखवण्यात येऊन त्या पठाराची भौगोलिक व ऐतिहासिक माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली.

दुपारनंतर सर्व विद्यार्थ्यांना पन्हाळगडावरील तीन दरवाजा, सज्जा कोठी, तबक उद्यान, धान्याचे कोठार यासह सर्व ऐतिहासिक स्थळांची माहिती देण्यात आली. वनभोजन व गडकिल्ल्यांची माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता.

या उपक्रमाचे नियोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुतीराव परितकर, कार्याध्यक्ष मंदार परितकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक एस. व्ही. पाटील, पी. पी. जाधव, एम. एम. आळवेकर, यू. एन. गुरव, पी. बी. टिक्के, कविता कुंभार, विद्या नारकर, कुमार रसाळ, विठ्ठल रसाळ, भीमराव परितकर यांनी केले होते.