‘यासाठी’ मराठी कलाकारांनी घेतली राज ठाकरेंची भेट

0
134

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी मिळाली असली, तरी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत जागतिक मराठी नाट्यकर्मी संघाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (मंगळवार) भेट घेतली.

नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या. या शिष्टमंडळात प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे आदींची उपस्थिती होती. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही यावेळी उपस्थित होते.

ठाकरे सरकारने नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास परवानगी दिली आहे. नाट्यगृह, सिनेमागृहे यांच्या एकूण आसन क्षमनतेच्या ५० टक्के आसनक्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान, करोना आणि लॉकडाउनच्या काळात अनेक मराठी कलाकारांना नानाविध अडचणींचा सामना करावा लागला आहे. आता नाट्यगृहे सुरु झाली असली  तरीही अडचणी संपलेल्या नाहीत. यावरच मराठी कलाकारांनी  राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली.