कोल्हापूर (प्रतिनिधी) : लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी कोल्हापूर शहरात ताराबाई पार्क येथे सीबीएस जवळ रगेड कब या लहान मुलांचे फिटनेस सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. पंचवीस हजार स्क्वेअर फूट या भव्य अशा परिसरात हे सेंटर साकारले असून येथे मुलांसाठी अनेक फिटनेस गेम्स असणार आहेत. यामध्ये किक बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, योगा, अॅथलेटिक, साहसी खेळ, मोटर स्किल्स, झुम्बा, एरोबिक्स, कार्यक्षम बनवण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आकाश कोरगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरगावकर म्हणाले की, वयाच्या तिसऱ्या वर्षापासून ते सोळाव्या वर्षापर्यंतच्या मुलांसाठी विविध वर्गांमध्ये येथे प्रशिक्षण देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे प्रशिक्षण देताना त्या मुलाची सहनशक्ती, क्रयशक्ती वाढवणे, गती, लवचिकता, नैसर्गिक सामर्थ्य, समतोलपणा, चपळाई, समन्वय, अचूकपणा, धाडस या सर्व गोष्टींवर त्यांच्या सुरक्षिततेसह भर देण्यात येणार आहेत. तसेच आठ मुलांच्या पाठीमागे एक तज्ज्ञ प्रशिक्षक याप्रमाणे सोळा मुलांची बॅच असेल. सकाळी आणि संध्याकाळी सोयीनुसार बॅचेस उपलब्ध असतील.

या सेंटरच्या सल्लागार समितीमध्ये आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे, जलतरणपटू ऋतुजा भाट – खाडे, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू संयोगिता घोरपडे, प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. शिल्पा जाधव, शिवाजी विद्यापीठाचे क्रीडा विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, १९+ आयर्न मॅन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिटनेस सेंटरचे संस्थापक डॉ. आनंद पाटील यांचा सहभाग आहे.

यावेळी अमोल कोरगावकर, राज कोरगावकर, सुप्रिया निंबाळकर आदी उपस्थित होते.