नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमधील मथुरा येथील तुरुंगामध्ये मूळची अमरोहा येथील असणाऱ्या शबनमला फाशी देण्यात येणार आहे. फाशीची तारीख निश्चित केलेली नसली तरी तुरुंग प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी देणाऱ्या मेरठच्या पवन जल्लादनेही या तुरुंगामधील फाशीघराची दोन वेळा पाहणी केली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला फाशी दिली जाणार आहे. त्यामुळे याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे.

अमरोहामध्ये राहणाऱ्या शबनमने २००८ साली प्रियकर सलीमच्या मदतीने स्वत:च्या घरातील ७ लोकांची कुऱ्हाडीने हल्ला करुन हत्या केली होती. या प्रकरणामध्ये  शबनमला फाशीची शिक्षा झाली आहे. राष्ट्रपतींनीही शबनमचा दयेचा अर्ज फेटाळल्याने तुरुंग प्रशासनाने शबनमला फाशी देण्याची तयारी सुरु केली आहे.

अमरोहामधील हसनपूरजवळ असणाऱ्या बावनखेडी गावात शबनम राहत होती. १४ आणि १५ एप्रिल २००८ मध्ये मध्यरात्री तिने आपल्या घरातील ७ जणांची हत्या केली. यात शबनमचे वडील मास्टर शौकत, आई हाश्मी, भाऊ अनीस आणि रशीद, वहिनी अंजूम आणि तिची बहीण रबीया या सहा जणांना समावेश होता. त्यानंतर शबनमने आपल्या लहान भाचाचीही गळा आवळून खून केला. सलीमसोबत असणाऱ्या आपल्या प्रेमाला कुटुंबाचा विरोध असल्याने शबनमने हे धक्कादायक कृत्य केले होते.