कोल्हापूर (विजय पोवार) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघा (गोकुळ) मधील सत्ताकारण हे मागील अनेक वर्षे काही ठराविक घराण्यातील एकीमुळे प्रस्थापित संचालकांना फायदेशीर ठरले आहे. पण आता सक्षम विरोधी गट तयार झाल्याने याच प्रस्थापित संचालकांच्या घराण्यात फूट पडत आहे. संचालक अरुण डोंगळे  यांच्या घराण्यात फूट पडल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता अरुण नरके यांच्या घराण्यातही फूट पडणार हे स्पष्ट झाले आहे.

माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा गट निवडणूक लागली, तर पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आघाडीकडून सत्तारुढ गटाच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे अजित नरके यांनी ‘लाईव्ह मराठी’शी बोलताना स्पष्ट केले आहे. गोकुळ दूध संघातील सर्वात ज्येष्ठ संचालक माजी चेअरमन अरुण नरके यांनी आपली राजकीय आणि सहकार क्षेत्रातील कारकीर्द गोकुळ मध्येच घालवली. अर्थातच गोकुळच्या अभूतपूर्व यश आणि प्रगतीमध्ये अरुण नरके यांचे योगदान मोठे आहे. आता त्यांनी स्वतः गोकुळची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करतानाच आपले चिरंजीव डॉ.चेतन नरके यांना संचालक करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पण अरुण नरके यांचे पुतणे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मात्र सत्तारूढ आघाडीच्या विरोधात आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आघाडीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे.

याबाबत चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की गोकुळच्या यशात अरुण नरके  आणि आनंदराव पाटील चुयेकर यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चुयेकर आमचे मामा होते. तर अरुण नरके आमचे चुलते आहेत. जिल्ह्यातील काही नेते गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना यश आले तर आमच्याही शुभेच्छा असतील. पण गोकुळची निवडणूक लागली तर आम्ही मात्र माजी आ. चंद्रदीप नरके यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा स्वतंत्र गट सत्तारूढ आघाडीच्या विरोधात आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या आघाडीच्या पाठीशी असेल. तसेच चंद्रदीप नरके गटाला किमान २ जागा मिळाव्यात अशी आमची आग्रही मागणी असेल. असे सांगताना त्यांनी स्वतः उमेदवारी करणार असल्याचेही सांगितले. तसेच आपला संपर्क दौरा ही सुरू असल्याचे सांगितले.

यामुळे नरके घराण्यातून डॉ. चेतन नरके विरुद्ध अजित नरके असे चित्र दिसणार आहे. अरुण नरके यांनी राजकीय आणि गोकुळच्या राजकारणात आपली भूमिका कायम वेगळी ठेवली होती. गोकुळमध्ये एकत्र असलेले अरुण नरके आणि आ.पी. एन. पाटील यांची आमदारकीच्या निवडणुकीत मात्र तोंडे विरुद्ध दिशेला राहिली आहेत. आमदारकीसाठी अरुण नरके यांनी आपला पुतण्या चंद्रदीप नरके यांना पाठिंबा देताना आमदार पी. एन. पाटील यांच्याविरोधात सक्रिय भूमिका घेतली आहे. पण गोकुळ मध्ये मात्र ते दोघेही एकाच आघाडीतून लढून जिंकत आले आहेत.

याबाबत अरुण नरके यांनी वेळोवेळी आमदारकीला पुतण्याच्या मागे आणि गोकुळ मध्ये पी. एन. पाटील यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. आता मात्र, तेच पुतणे त्यांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहणार आहेत. यातून नरके घराण्यातील फुटही अटळ आहे. याचे दूरगामी परिणाम करवीर विधानसभा निवडणुकीत दिसणार आहेत. त्याचा फायदा चंद्रदीप नरके यांना आमदारकीसाठी होणार आहे. असे तर्क लावले जात आहेत.