नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फुटबॉल विश्वचषकातील ग्रुप ए मधील पात्रता फेरीच्या सामन्यात २ गोल करत पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो सर्वाधिक  गोल करण्याचा विक्रम आपल्या नावावर कोरला. इराणचा माजी स्ट्रायकर अली डेई यांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातील १०९ गोलचा विश्वविक्रमशी ख्रिस्तियानो ने बरोबरी साधली होती. काल  झालेल्या  सामन्यात शेवटच्या काही मिनिटात २ गोल करत हा विक्रम ख्रिस्तियानो रोनाल्डोने मोडीत काढला.  

फुटबॉल विश्वचषकातील ग्रुप ए मधील पात्रता फेरीत पोर्तुगालने आयर्लंडचा २-१ ने पराभव केला. या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोने २ गोल केल्याने  आता आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याचे १११ गोल झाले आहेत.

इराणच्या अली डेई १४९ सामन्यात १०९ गोल,  पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने १८० सामन्यात १११ गोल,  मलेशियाच्या मोख्तार दहारी ८९ गोल, हंगेरीच्या फेरेन पुस्कस ८४ गोल आणि जाम्बियाच्या गॉडफ्रे चितालू ७९ गोल, यांची टॉप ५ मध्ये नोंद आहे. सध्या या पाच खेळाडूंमध्ये रोनाल्डो हाच आंतरराष्ट्रीय सामने खेळत आहे. त्यामुळे त्याचा हा विक्रम मोडणे कठीण आहे.

रोनाल्डोने यापूर्वी सलग ५ युरो चषकात एकूण १४ गोल करण्याची किमया साधली आहे. त्याने २००४, २००८, २०१२ आणि २०१६ या युरो स्पर्धेत गोल झळकावले आहेत. रोनाल्डो पोर्तुगालकडून तसेच युरो चषकात सर्वाधिक गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.