खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अन्न सुरक्षेसंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षण घेणे बंधनकारक  

0
235

टोप (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा आणि प्रशिक्षण प्रमाणपत्र योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेते, व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासनातर्फे ऑनलाईन प्रशिक्षण तसेच कोवीडबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी सर्व विक्रेत्यांनी आणि व्यावसायिकांनी ऑनलाइन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्राचे नोडल ऑफिसर कृष्णकांत पाटील व कोल्हापूर जिल्ह्याचे नोडल ऑफिसर योगेश रेडेकर यांनी केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

या योजनेअंतर्गत शहर व ग्रामीण भागातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेते व्यावसायिक व व्यापाऱ्यांना अन्न सुरक्षिततेसाठी प्रशिक्षण व नोंदणी करणे अनिर्वाय आहे. व्यावसायिक नोंदणीस टाळाटाळ करतील, तर त्यांचे प्रमाणपत्र नुतनीकरण होणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.

तरी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी तालुक्यातील फिल्ड ऑफिसरकडे रीतसर नोंदणी करून घ्यावी. या प्रशिक्षणात दुकानांमध्ये साफसफाई कशी ठेवावी, खाद्य पदार्थावर येणारी बुरशी, किटक कसे रोखावेत, दुकानात औषध फवारणी कशी करावी, याबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी प्रशिक्षण न घेणाऱ्या व्यावसायिकांच्या जुन्या परवान्याचे नूतनीकरण होणार नाही. त्यामुळे सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी प्रशिक्षण घेणे आवश्यक असल्याचे अन्न व औषध प्रशासन म्हटले आहे.