शेतकऱ्यांसाठी बंद पाळा : खा. संजय राऊत

0
82

मुंबई (प्रतिनिधी) : नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्‍या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला महाविकासआघाडी सरकारने पाठिंबा दिला आहे. आमचे तीन पक्ष एकत्र आहेत. तिन्ही पक्षांनी पाठींबा दिल्याचे जाहीर केले आहे. हा बंद फार वेगळा आहे. शेतकऱ्यांसाठी बंद पाळावे, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले. मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते. 

ते म्हणाले, महाविकासाघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची भूमिका घेतली होती. हा कोणताही राजकीय बंद नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही. तर शेतकऱ्यांचा आवाज बुलंद होण्यासाठी हा बंद पाळावा. शेतकरी हा संकटातही शेतात राबतो. आपण लॉकडाऊनमध्ये घरी बसलेले असताना त्याने आपल्याला साथ दिली. आज त्याला आपली गरज असेल, तर त्याला साथ द्यावी. गेल्या १०-१२ दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. थंडीत आंदोलनाला बसला आहे. त्यामुळे जनतेने सुद्धा हा बंद शांततेने पाळावा असे आवाहन त्यांनी केले.