पुणे (प्रतिनिधी) : गेलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्यात पुन्हा येणार नाही. त्यावर आता चर्चा करून काही उपयोग नाही. नवीन प्रकल्प कसे येतील, यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. केंद्रातील सत्ता हातात असल्यास राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जातात, असे प्रकार घडत असतात. शिंदे-भाजप सरकारला राज्यात प्रकल्पाची गरज वाटत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला. पवार हे पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी एकमेकांना दूषणे देण्याचे आणि विविध प्रश्नावरून वाद करायचे या गोष्टी बंद करायला हव्यात आणि महाराष्ट्रातील वातावरण सुधारून विकासाच्या दृष्टीने आपण पुढे कसे जाऊ, यासाठी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असा सल्ला शरद पवारांनी दिला.

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून सध्या सुरू झालेल्या राजकारणावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘टीका करा, पण रोजच करू नका. एक दिवस-दोन दिवस ठीक आहे. शरद पवारांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे गट व भाजपासोबतच विरोधी पक्षांनाही सुनावले. ‘आज टीव्ही लावला की एकच ऐकायला मिळते.. झाड काय, हवा काय .. .एखाद्या वेळी ठीक आहे; पण रोजच या गोष्टी पाहायला मिळतात. राज्याच्या प्रमुख लोकांनी राज्याचा विचार मांडायला हवा. त्याऐवजी सातत्याने एकमेकांशी वाद काढले जात आहेत. हे बरोबर नाही.

पवार म्हणाले, मोदी आणि शाह हे केंद्रांत सत्तेत असून त्यांचे सर्वात जास्त दौरे गुजरातमध्येच असतात. तळेगावच्या आजूबाजूला चाकण, रांजणगाव औद्योगिक परिसर असून, त्याला ऑटोमोबाइल हब म्हणून ओळखले जाते. इथे प्रकल्प टाकला असता, तर वेदांत कंपनीला ही चांगले झाले असते. कंपनीला आपली कंपनी कुठे चालवायची हा त्यांचा अधिकार आहे. यापूर्वी सुद्धा अशाप्रकारे कंपनीने भूमिका घेतली असून, त्यात नवीन काही वाटत नाही.