कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यामध्ये व कोल्हापूर शहरामध्ये जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ज्यांच्या दुकानामध्ये, टपरीमध्ये पुराचे पाणी जावून नुकसान झाले आहे, अशा बाधितांना महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयामध्ये मदतीसाठी सुधारित निकष जाहीर करण्यात आलेले आहेत. या सुधारीत निकषानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष तथा करवीरच्या तहसिलदार शितल मुळे-भामरे यांनी केले आहे.

कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील बाधित दुकानदार, टपरीधारक यांनी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तर करवीर ग्रामीण भागामधील बाधित दुकानदार व टपरीधारकांनी तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथे कागदपत्रे सादर करावीत, जेणेकरून लवकरात-लवकर निकषानुसार पात्र बाधितांना तत्काळ मदत वितरीत करणे सोईचे होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

ज्या दुकानदारांकडे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४५ खालील परवाना नसेल अथवा परवाना नुतनीकरण केला नसेल. त्यांनी खालीलपैकी कोणताही एक परवाना सादर करावा. अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात येणारे अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम २००६ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र,  केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम अदयम मंत्रालय यांच्याकडून दिले जाणारे उद्योग आधार प्रमाणपत्र, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम  २०१७ अन्वये देण्यात आलले नोंदणी प्रमाणपत्र नमुना ब ( कामगार यांची संख्या नमूद केली आहे.), महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम २०१७ अन्वये देण्यात आलले नोंदणी प्रमाणपत्र नमुना ग, केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम अदयम मंत्रालय यांच्याकडून गृह उद्योगाकरिता दिले जाणारे उद्यम प्रमाणपत्र आवश्यक आहे.

मदतीची रक्कम वितरीत करण्यापूर्वी संबंधित दुकानदार यांनी महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम १९४८ खालील परवान्याचे नुतनीकरण करणे अथवा नवीन परवाना मिळविणे आवश्यक असेल. यानंतरच मदतीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे तहसिलदार मुळे-भामरे यांनी सांगितले आहे.