कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील खोची येथे ऑगस्ट, सप्टेंबर २०१९ च्या महापुरातील पूरग्रस्तांचे पंचनामे चुकीच्या पद्धतीने केले आहेत. त्यामुळे इथल्या अनेक पूरग्रस्तांना शासनाच्या मदतीपासून वंचित रहावे लागले आहे. शासनाच्या मदतीपासून वंचित राहिलेल्या ९ पूरग्रस्तांनी महापुरातील मदत तातडीने मिळावी, या मागणीसाठी आजपासून (सोमवार) कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

ऑगस्ट, सप्टेंबर २०१९ मध्ये आलेल्या महापुरात खोची येथील अनेक पूरग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, पंचनामे चुकीच्या पद्धतीने झाल्याने काही शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळाली नाही. त्यासाठी वंचित पूरग्रस्तांच्या वतीने तहसिलदारांसह संबंधित विभागाशी वारंवार पाठपुरावा करून ही याची दखल न घेतल्याने आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले.

या आंदोलनात अभिजित वाघ, बंडू थोरवत, सोनाजी गोसावी, बाबुराव नाईक, बाळासो नाईक, बाळासो पोवार, लक्ष्मण घाटगे, सुर्यकांत गिरीगोसावी, भरत नाईक, रावसो नाईक यांनी सहभाग घेतला आहे.