कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका…

0
275

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे  कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ३६ फुटांवर पोहोचली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पुण्याहून कोल्हापूरकडे एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना झाल्या आहेत.

या पावसामुळे कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर पुराचं पाणी आलं असून या मार्गावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच मांडुकली येथं कुंभी नदीचं दोन फूट पाणी रस्त्यावर आलं आहे. त्यातच धोक्याची पाणी पातळी गाठण्यासाठी पंचगंगा नदीत चार फूट पाणी कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात असाच पाऊस राहिल्यास पंचगंगा नदी लवकरच धोक्याची पातळी ओलांडेल. ३९ फूट ही पंचगंगा नदीची इशारा पातळी असून सध्या नदीची पातळी ३६ फूट आहे.

जिल्ह्यातील चंदगड, गगनबावडा तालुक्यांमध्ये रात्रभर अतिवृष्टी झाली आहे. बर्की गावात जाणाऱ्या पुलावर पाणी आल्यानं बर्की गावचा संपर्क तुटला आहे. शाहुवाडी तालुक्यातील गेळवडे धरणातील पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. कासारी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. कुंभी धरणातून एकूण ७८० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून किरवे येथे कोल्हापूर-गगनबावडा रस्तावर पाणी आल्यानं रस्ता बंद झाला आहे.

गडहिंग्लज तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. नीलजी आणि ऐनापूर हे दोन बंधाऱ्यावर पाणी आल्यानं वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. त्यातच गडहिंग्लज-चंदगड मार्गावर दुपारपर्यंत पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग बंद करण्यात आला आहे. मलकापूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर येल्लुर गावाजवळ दोन फूट पाणी आल्यानं प्रशासनानं महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.