कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे शहरात झालेले लॉकडाऊन आणि यावर्षी आलेला महापूर यामुळे कोल्हापुरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातील बहुतेक व्यवसाय अत्यंत कमी कालावधीसाठी सुरू राहिले. पूरबाधित क्षेत्रातील नागरिक आणि व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. अशा नागरिकांचा घरफाळा आणि पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी पालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे.

यावेळी, पूरग्रस्त भागातील ज्या मिळकतींना पुराचा फटका बसला आहे अशा सर्व मिळकतींचा सन २०२० व २०२१ चा घरफाळा आणि पाणीपट्टी माफ करावा. कोल्हापूर शहरातील सर्व छोटे-मोठे व्यवसायिक,  दुकानदार, कारखानदार, फेरीवाले, सेवा उद्योगात असणाऱ्या संस्था या सर्वांचा सन २०२० व २०२१ चा घरफाळा पूर्णपणे माफ करण्यात यावा. तसेच लॉकडाऊन आणि महापुराच्या कालावधीत व्यवसाय बंद असलेल्या काळाचे पाणी बिल माफ करण्यात यावे. अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी, पूरबाधित क्षेत्रांचे पंचनामे सुरु असून येत्या २ ते ३ दिवसांत नागरिकांना भरपाई मिळण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. पूर परिस्थितीमध्ये उपाय योजना म्हणून अनेक कामांसाठी प्रस्ताव पाठवला आहे. नालेसाफाई, नाल्यांवरील अतिक्रमण अशा बाबी गंभीर असून सर्व ठिकाणचे पंचनामे पूर्ण होताच अशा विषयांमध्ये कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, विजयसिंह खाडे-पाटील, सागर आथणे आदी उपस्थित होते.