सांगली (प्रतिनिधी) : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवार) जाहीर झाला. महाविकास आघाडीच्या पॅनेलने १८ पैकी १४ जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. तर आघाडीच्या पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढवल्याने भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले.  

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी जतमधील काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत यांना पराभव केला. काँग्रेस नेते, आमदार मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, विजयी झाले. तर पतसंस्था गटातून भाजपचे राहुल महाडिक आणि औद्योगिक प्रक्रिया गटातून सत्यजित देशमुख, संग्रामसिंह देशमुख यांनी विजय मिळवला.

बँकेवर भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. परंतु राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली महापालिकेनंतर जिल्हा बँकेतही भाजपचा पराभव करत सत्तेतून बाहेर काढले. एकूण २१ जागांपैकी १७ जागा जिंकत महाविकास आघाडी पॅनेलने परिवर्तन घडवले.