इचलकरंजीत स्मशानभूमीतील कर्मचाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण

0
82

इचलकरंजी (प्रतिनिधी) : येथील आर्य चाणक्य पत संस्थेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिन आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. येथील पंचगंगा नदी स्मशानभूमीत गेल्या काही वर्षांपासून सेवा बजावत असलेल्या अमरय्या स्वामी या कर्मचाऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण करून संस्थेने त्यांच्या कार्याचा गौरव केला.

अमरय्या स्वामी हे काही वर्षांपासून पंचगंगा नदीघाटावरील स्मशानभूमीत काम करत आहेत. आर्य चाणक्य अंत्यसंस्कार सेवा संस्थेकडून शहर व ग्रामीण भागातून अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या नागरिकांना योग्य ते साहित्य तसेच सेवा पुरवली जाते. त्याठिकाणी स्वामी हे आपले कर्तव्य बजावत असून आजवर सुमारे १९ हजारांहून अधिक म्रुतदेहांवर त्यांनी अंत्यविधी केले आहेत. याठिकाणी मृतदेह घेऊन येणार्‍या नातेवाईकांना स्वामींकडून सर्वतोपरी विधीवत मार्गदर्शन केले जाते.

त्यांच्या याच कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आर्य चाणक्य पतसंस्थेचे अध्यक्ष जवाहर छाबडा, उपाध्यक्ष राजेंद्र राशिनकर, सेवा भारती रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेश पवार, सर्व संचालक, कर्मचारी व सभासद उपस्थित होते.