कोल्हापूर (प्रतिनिधी) : सात वर्षाच्या मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेवून अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने एकाला ५ वर्ष सक्तमजुरीसह ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा आज (शनिवार) सुनावली. कुमार महादू गायकवाड (वय ३०, रा. राजेंद्रनगर वसाहत, कोल्हापूर) असे त्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सरकारी वकील म्हणून अॅड. प्रतिभा जाधव यांनी काम पाहिले.

कुमार गायकवाड याने राजेंद्रनगर झोपडपट्टी नवीन वसाहत येथे १२ जून २०१३ रोजी दुपारच्या सुमारास सात वर्षाची मुलगी रिक्षामध्ये खेळत असताना पिडीत मुलीच्या अल्पवयीन अज्ञानपणाचा फायदा घेवून तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे पिडीतीच्या आईने सदर कृत्याबद्दल कुमार गायकवाड विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने बाल लैंगिक अत्याचार सरंक्षण कायदा १९१२ मधील कलम ४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. तर सदरचा खटल्या प्रकरणी सरकारी पक्षाने एकूण सहा साक्षीदार तपासले. यातील फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

सरकारी वकील अँड. प्रतिभा जाधव, सहाय्यक सरकारी वकील यांनी केलेला युक्तिवाद आणि प्रत्यक्ष पुरावा, तक्रारी ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी कलम ३५४ संरक्षण कायदा २०१२ मधील कलम १० मध्ये कुमार गायकवाड याला दोषी ठरवले. त्याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.