टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली फाटा येथे एसटी बसने मोटरसायकलला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्याकडेला थांबलेल्या टेम्पोला मागून धडक दिल्याने बसमधील चार प्रवासी आणि मोटारसायकलस्वारासह पाच जण जखमी झाले आहेत. रिना विजय समुद्रे (वय ३४), सुशीला विजय समुद्रे (वय ६५, दोघीही रा. किणी ता. हातकणंगले), नेताजी विश्वास नलवडे (वय ६२,  रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर), बाबासाहेब सर्जेराव हिरवे (वय ३०, रा. पैजारवाडी, ता. पन्हाळा) या प्रवाशांसह मोटारसायकलस्वारावर (नाव समजू शकले नाही) कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात आज (बुधवार) दुपारी दीडच्या सुमारास घडला.

सिमेंटची पोती घेऊन निघालेला टेम्पो (क्र. एमएच ०९ सी यू ६८८९) टायर पंक्चर झाल्याने शिरोली फाट्यावर रस्त्याकडेला उभा करण्यात आला होता. इतर वाहनधारकांना समजण्यासाठी चालकाने गाडीच्या बाजूने झाडाच्या फांद्या लावल्या होत्या. इस्लामपूरहून कोल्हापूरकडे जाणारी एसटी (क्र. एमएच १४ बीटी ५०७) आज दुपारी दीडच्या सुमारास शिरोली फाट्यावर आली असता मोटारसायकलला (क्र. एमएच ०९ सी ई ४२२२) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटला. एसटीने या टेम्पोला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की टेम्पो महामार्गाच्या मध्यभागी असणाऱ्या डिव्हायडरवर जाऊन थांबला. या अपघातात चार प्रवासी आणि मोटारसायकलस्वारासह पाच जण जखमी झाले आहेत.