इचलकरंजी (प्रतिनिधी) :  कबनूर येथील संदीप सुरेश मागाडे याचा राजकीय वैमनस्यातूनच खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या खून प्रकरणी कुणाल भिकाजी कांबळे याने फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी यावेळी, कुमार कांबळे, रवि कांबळे, रमजान सनदी, मुदस्सर खुदबुद्दीन घुणके (वय २१, रा. सिध्दार्थनगर), असिफ खताळ, शाहरुख आझाद शेख (वय २४, रा. दर्गामागे कबनूर), रोहन सतिश कुरणे (वय २०, रा. सिद्धार्थनगर), शाहरुख मुबारक अत्तार (वय २२, रा. जवाहरनगर), राहुल अनिल शिंदे (वय २९, रा. सिद्धार्थनगर), आकाश कांबळे, संकेत कांबळे, मोहसीन सनदी, राकेश कांबळे, ऋषिकेश वडर आणि अन्य सहा जणांचा समावेश आहे. यापैकी मुदस्सर घुणके, शाहरुख शेख, रोहन कुरणे, शाहरुख अत्तार व राहुल शिंदे यांना अटक करण्यात आली आहे.

कबनुरातील भीमराज भवन परिसरात राहण्यास असलेल्या संदीप मागाडे याचा आणि संशयित कुमार कांबळे यांच्यात ग्रामपंचायत निवडणूक निकालवेळी वाद झाला होता. त्यावेळी संशयिताने संदीप याला बघून घेतो अशी धमकी दिली होती. शनिवारी दुपारच्या सुमारास सुरज कांबळे आणि मोठा शाहरुख यांच्यात झालेली भांडणे मिटविण्यासाठी कुमार कांबळे याने फिर्यादी कुणाल याचा आतेभाऊ संदीप मागाडे याला मुजावरकी मैदानात बोलावून घेतले होते. त्याठिकाणी पुन्हा राजकीय वाद उफाळून आला आणि त्यातूनच संदीप याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी संशयिताने जवळील चाकूने संदीप याच्यावर वार केला. परंतु तो वार संदीपने हातावर घेतला.

त्याचवेळी रोहन कुरणे याने कोयत्याने संपीच्या डोकीत वार केला. तर शाहरुख शेख व शाहरुख अत्तार यानी तलवारीने संदीपच्या डोक्यात व तोंडावर वार केले. तर मोहसीन सनदी याने दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. वार चुकवत संदीप मागे जात असतानच कुमार कांबळे याने पुन्हा संदीपला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही भांडणे सोडविण्यासाठी कुणाल व त्याचे सहकारी जात असतानाच मुज्जफर घुणके, असिफ खताळ, आकाश कांबळे, राहुल शिंदे, संकेत कांबळे, राकेश कांबळे, ऋषिकेश वडर यांनी त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्यात व तोंडावर वर्मी घाव बसल्याने संदीप रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी सांगितले.

या घटनेची माहिती समजताच संदीप याच्या नातेवाइकांसह समर्थकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. या घटनेमुळे कबनुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटना कळताच शिवाजीनगर पोलिसांनी धाव घेतली. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बाबूराव महामुनी, आदींनी घटनास्थळी भेट दिली. हल्ला इतका जोरदार होता की तलवारीची मूठ तुटली होती. घटनास्थळीच रक्ताने माखलेली तलवार, दगड पोलिसांना मिळून आले. एक मोपेड व एक मोटारसायकल अशा दोन दुचाकीही संशयितांच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.

दरम्यान, हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय संदीपचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. तपासात हल्लेखोरांची नांवे निष्पन्न झाल्याने व पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर संदीप याचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्यात आला.