कोल्हापूर (प्रतिनिधी) : दोन जलाशयांची अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल आणि मत्स्य जाळ्याची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी दोन लाखांची लाच घेणाऱ्या मत्स्यव्यवसाय कार्यालयातील विकास अधिकारी प्रदीप केशव सुर्वे (रा. कारंडेमळा, कोल्हापूर) रंगेहाथ अटक करण्यात आली.

याबाबतची अधिक माहिती अशी, कोल्हापुरातील एका व्यक्तीचा मत्स्यव्यवसाय आहे. त्यांच्याकडे दोन जलाशय ठेकेतत्वावर आहेत. २०१९ साली झालेल्या अतिवृष्टीमुळे या दोन्ही जलाशयातील मासे आणि जाळी वाहून गेली होती. महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्तांसाठी नुकसान भरपाई जाहीर केली होती. त्यामुळे त्या व्यक्तीने महसूल विभागामार्फत पंचनामे करून घेतले होते. अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्या व्यक्तीने कसबा बावडा येथील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयामार्फत शासनाकडे पाठवला होता.

त्यानुसार २६ लाखांची नुकसान भरपाई त्या व्यक्तीच्या संस्थेच्या खात्यावर जमा झाली आहे. मात्र, मत्स्यजाळ्याची नुकसान भरपाई त्या व्यक्तीला मिळालेली नाही. त्यामुळे त्या व्यक्तीने मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी प्रदीप सुर्वे यांची भेट घेऊन याबाबतची विचारणा केली होती. त्यावेळी सुर्वे याने त्या व्यक्तीला २६ लाखांची नुकसान भरपाई मिळवून दिल्याबद्दल व मत्स्य जाळ्याची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी दहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.तडजोडीअंती सुर्वे याने ५ लाखांच्या लाचेची मागणी केली.

याबाबतची तक्रार त्या व्यक्तीने कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार या विभागाने पडताळणी केली असता, सुर्वे याने पाच लाखांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. या पाच लाखांपैकी दोन लाख रुपये घेण्यासाठी प्रदीप सुर्वे हा त्या व्यक्तीच्या कार्यालयात आला होता. त्यावेळी त्या व्यक्तीकडून दोन लाखांची लाच घेताना प्रदीप सुर्वे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, प्रभारी अप्पर पोलीस उपआयुक्त सीमा मेहंदळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत,हावलदार शरद पोरे, आदींनी केली.