पुणे (प्रतिनिधी) : पुण्यात आता जपनी मेंदूज्वराचा रुग्ण आढळून आला आहे. एका चार वर्षांच्या मुलाला या आजाराची बाधा झाली आहे. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुणे महापालिकेच्या क्षेत्रात पहिल्यांदाच या आजाराचा रुग्ण आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी पालिकेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. 

वडगाव शेरी परिसरातील चार वर्षांच्या मुलाला जॅपनीज एन्सेफलायटिस म्हणजेच जपानी मेंदूज्वर या आजाराचे निदान झाले आहे. हा विषाणूजन्य आजार आहे. या मुलाला तीन नोव्हेंबर रोजी ससून रुग्णालयातील बालरुग्ण अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डोकेदुखी, अशक्तपणा आणि फिट येणे ही लक्षणे दिसून येत होती. त्यानुसार रुग्णालयात विविध तपासण्या केल्या. नियमित उपचारही सुरु ठेवण्यात आले. मुलाच्या रक्ताचे तसेच मणक्यातील पाण्याचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेत पाठवण्यात आले होते. या संस्थेने २९ नोव्हेंबर रोजी रुग्णाचा अहवाल ससूनला दिला. त्यामध्ये त्याला जपानी मेंदूज्वर असल्याची माहिती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे