भंडारा जिल्हा रुग्णालयात आग : दहा चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू

0
444

भंडारा (प्रतिनिधी) : भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांच्या दक्षता विभागाला आग लागून १० नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. ही घटना शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. नवजात बालकांचं वय एक महिने ते तीन महिन्यांचं होतं, अशी माहिती डॉक्टरांनी दिलीय. या विभागातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचेसह बहुतांश नेत्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १.३० वाजल्याच्या सुमारास रुग्णालयात ही आग लागली होती. रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या दक्षता विभागातून धूर येत असल्याचं सर्वात अगोदर एका नर्सच्या लक्षात आलं होतं. त्यानंतर डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांनी तिथे पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
या विभागात १७ बालकांवर उपचार सुरू होते. आगीतून सात बालकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सात बालकांना सुखरूप बाहेर काढलं परंतु, १० बालकांना एव्हाना प्राण गमवावे लागले होते. या बालकांना ज्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं होतं तिथे सलग ऑक्सिजन पुरवठा गरजेचा आहे. या वॉर्डमध्ये आग विझवण्यासाठी उपकरणही उपलब्ध होते. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्नही केला परंतु, तिथे धूर पसरला होता, असं स्पष्टीकरण रुग्णालयाकडून देण्यात आलंय.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.