कोल्हापूर (प्रतिनिधी) : मेंदूची शस्त्रक्रिया झालेला कोल्हापुरातील नामवंत फुटबॉलपटू निखिल खाडे हा बरा होईपर्यंतची त्याच्या उपचाराची सर्व जबाबदारी डी. वाय. पाटील ग्रुप उचलेल, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली.

आज तज्ञ डॉक्टरांसह कुटुंबीयांसोबत नातेवाइकांशी निखिलवरील उपचाराबाबत सविस्तर चर्चा केली. डॉ. संजय डी. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. पाटील ग्रुप निखिलच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने सव्वा लाख रुपयांची मदत निखिलच्या वडिलांकडे देण्यात आली.

कोल्हापुरातील ख्यातनाम फुटबॉल खेळाडू आणि दिलबहार तालीम मंडळाचा गोलकीपर निखिल खाडे याच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आ. ऋतुराज पाटील यांनी सिटी हॉस्पिटलमध्ये त्याची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. गुरुवारी आमदार पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी मेंदूवरील तज्ञ डॉक्टरांसोबत निखिलच्या प्रकृतीबाबत सविस्तर चर्चा केली. त्याच्या उपचार व खर्चाची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. कुटुंबीयांनी त्याला भक्कम मानसिक आधार द्यावा, असे आमदार पाटील यांनी सांगितले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या स्टाफने सव्वा लाख रुपयांची मदत निखिलचे वडील दिलीप खाडे यांच्याकडे दिली.

डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, प्राचार्य डॉ. महादेव नरके  रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डी. डी. पाटील, मेंदू तज्ञ डॉ. उदय घाटे, दिलीप खाडे, अॅड. अभिजित नलवडे, पवन पाटील, अजित पाटील, प्रा. योगेश चौगले, विराज पसारे, अर्जुन पोवाळकर, अक्षय भोसले आदी उपस्थित होते.

निखिलला मानसिक आधार देऊया

कोल्हापुरातील फुटबॉलपटू निखिल खाडेच्या पाठीशी डी. वाय. पाटील ग्रुप भक्कमपणे उभा आहे. या काळात त्याला खरी गरज आहे ती मानसिक आधाराची. त्याला लवकरात लवकर बरे होण्यासाठी सर्वांनी प्रार्थना करूया. त्याला प्रोत्साहित करून मानसिक बळ देऊया. आपल्या सर्वांच्या सदिच्छा निखिलला निश्चितपणे या संकटातून बाहेर काढण्यासाठी बळ देतील.

-ऋतुराज पाटील, आमदार, कोल्हापूर दक्षिण

……………..

‘डीवायपी’ ग्रुपमुळे मिळाला भक्कम आधार

निखीलवर शस्त्रक्रिया झाल्याचे कळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी तातडीने रूग्णालयात येऊन त्याची विचारपूस केली. डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून आ. पाटील यांनी आम्हाला आर्थिक पाठबळ तर दिलेच पण कोलमडून पडलेल्या आमच्या कुटुंबाला धीर देत भक्कम आधार दिला. आमदार पाटील व डी. वाय. पाटील ग्रुपच्या भक्कम पाठबळामुळे ही लढाई धीराने लढत आहोत.

-दिलीप खाडे, निखिलचे वडील (रिक्षा व्यावसायिक)