अखेर सौंदत्तीतील श्री रेणुकादेवीचे मंदिर खुले…

0
210

बेळगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील ११ महिन्यांपासून बंद असलेले सौंदत्ती (जि. बेळगाव) येथील श्री रेणुका देवीचे मंदिर आजपासून (सोमवार) खुले करण्यात आले आहे. कोरोनाचे सावट कमी झाल्याने मंदिर खुले करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला. यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.

कर्नाटकातील इतर मंदिरे ८ जून २०२० रोजीच सुरू करण्यात आली होती,  पण सौंदत्ती येथे अनेक राज्यातून भाविक येत असतात. भक्तांची संख्या प्रचंड असल्याने त्यांच्यामध्ये कोरोनाची साथ पसरल्यास त्याला आळा घालणे मुश्कील होऊन हे ओळखूनच प्रशासनाने हे मंदिर उघडले नव्हते. भाविकांकडून मात्र मंदिर लवकर उघडावे अशी मागणी होत होती.

सौंदत्ती डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने २२ जानेवारीपासून ९ फेब्रुवारीपर्यंत यात्रा चालणार होती. या यात्रेसाठी दरवर्षी डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत असतात. जानेवारीमध्ये शाकंभरी पौर्णिमेला यात्रेसाठी बेळगावसह उत्तर कर्नाटकमधून लाखो भाविक डोंगरावर येत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली होती. आज मात्र मंदिर खुले केल्याने भाविकांची देवदर्शनाची प्रतीक्षा संपली आहे.