करवीर (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अखेर गांधीनगर मुख्य रस्त्यावरील मोठे खड्डे बुजविण्यात आले आहेत. वेळाने का होईना पण ‘देर आये दुरुस्त आये’ असे म्हणत दीपावलीनंतर हे खड्डे बुजविण्यात आले. या मार्गावरील खड्डे बुजवावेत, म्हणून गांधीनगर येथील अमोल एकळ फाउंडेशनतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे यांना निवेदन देऊन सतत पाठपुरावा करण्यात आला होता.

तावडे हॉटेल ते चिंचवाड हा जिल्हामार्ग म्हणून ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्राची मोठी व्यापारपेठ असणाऱ्या गांधीनगरचा हा मुख्य रस्ता मोठया वर्दळीचा आहे. विविध भागांतून हजारो नागरिक याठिकाणी दररोज खरेदीसाठी येत असतात. ऑगस्टनंतर दीपावली, तसेच त्यानंतर लग्नसराई संपेपर्यंत याठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. पावसाळ्यानंतर या मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे अनेक अपघात घडले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने दीपावलीपूर्वी तातडीने अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. पण खड्डे बुजविण्यास दुर्लक्ष केले. यामुळे गांधीनगर परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली. पण आता रस्त्यांचे काम झाल्यावर नागरिक तसेच व्यापारी वर्गातून याबद्दल समाधान व्यक्त होत आहे.