नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या अक्षरश: थैमान घातलं आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहेत, शिवाय रुग्णांच्या मृत्यूसंख्येतही वाढ सुरूच आहे. अनेक रुग्णांना आवश्यक असलेलं रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नसून, रुग्णांच्या नातेवाईकांना या इंजेक्शनसाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच, या इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने रेमडेसीवरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

जोपर्यंत देशात कोरोनाची स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येत नाही तोपर्यंत रेमडेसीवीरच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. याशिवाय ज्या स्थानिक कंपन्या रेमडेसीवीरचं उत्पादन करतात त्यांना त्यांच्या वेबसाईटवर संपूर्ण साठ्याची माहिती देखील टाकावी लागणार आहे. कोणत्या वितरकांच्या माध्यमातून त्या पुरवठा करत आहेत, याबाबत देखील माहिती द्यावी लागणार आहे. तसेच, औषध निरीक्षक व इतर संबंधित अधिकाऱ्यांना रेमडेसीवरच्या साठ्यावर सातत्याने लक्ष द्यावे लागणार आहे आणि काळाबाजार रोखण्यासाठी काय उपाय करण्यात आले आहेत, हे देखील जाहीर करावं लागणार आहे.