कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि जिल्हाचे राजकारण, अर्थकारण अवलंबून असणाऱ्या गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २ मे २०२१ रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे २५ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याची घोषणा राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने आज (मंगळवार) केली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना आता पुन्हा वेग आला आहे.

यंदा गोकुळच्या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले असून सत्ताधारी आघाडी विरोधात विरोधकांनी चांगलीच कंबर असल्याची दिसून येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर असणार आहेत. तर अर्ज भरण्यापासून माघारी पर्यंतची प्रकिया नावडकर यांच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कार्यालयात होणार आहे.

गोकुळच्या निवडणूकीसाठी एकुण ३,६५० मतदार आहेत. २१ संचालक पदाच्या जागांसाठी हे मतदान होणार आहे. यामध्ये सर्वसाधारण गट १६, महिला प्रतिनिधी २ तर ओबीसी, अनुसूचित जाती, भटक्या विमुक्तीसाठी प्रत्येकी १ अशा जागा आहेत.

गोकुळ निवडणूक कार्यक्रम..

उमेदवारी अर्ज भरणे – २५ मार्च ते १ एप्रिल.

छाननी – ५ एप्रिल.

वैध उमेदवार यादी प्रसिद्ध – ६ एप्रिल.

अर्ज माघारी – ६ एप्रिल ते २० एप्रिल.

चिन्ह वाटप – २२ एप्रिल.

मतदान – २ मे.

मतमोजणी – ४ मे.