इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी महापालिकेच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे. इचलकरंजी ही राज्यातील २८ वी, तर कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी महापालिका आहे. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. महापालिका करण्यासाठी सर्व पक्षीय मंडळींनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे महापालिका करण्याच्या प्रक्रियेत राजकीय अडथळा आला नाही. महापालिका करण्याबाबतचा आदेश गुरुवारी नगरविकास विभागाने जारी केला आहे.

शासनाचे उपसचीव सतीश मोघे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश दिला असून, महापालिकेचा पुढील कामकाज पाहण्यासाठी मुख्याधिकारी श्रेणीतील एस. व्ही. देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर याबाबतच्या हालचाली गेल्या दोन दिवसांपासून सुरु होत्या. पालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर आता महापालिका झाल्याचा फलक झळकणार असून, त्यामुळे लवकरच इचलकरंजीला राज्यात नवी ओळख मिळणार आहे.

इचलकरंजीची शहराची लोकसंख्या सद्यस्थितीला साडेतीन लाखांच्या पुढे गेली आहे. वाढत्या नागरिकरणांमुळे विविध नागरी सुविधा पुरविताना पालिका प्रशासनावर ताण पडत आहे. त्यामुळे महापालिका करण्याचा प्रस्ताव पुढे आला. खासदार धैर्यशील माने यांनी यांनी याबाबतचा राज्य शासन पातळीवर यशस्वी पाठपुरावा केला. त्यानंतर माजी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी इचलकरंजी महापालिका करण्याबाबतची घोषणा केली होती.

पहिल्या टप्प्यात महापालिका करण्याचा शासनाने इरादा जाहीर करीत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये केवळ सात हरकती व सूचना दाखल झाल्या; पण त्या जुजबी होत्या. त्यामुळे महापालिका करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर राज्य शासनाच्या पातळीवर महापालिकेच्या प्रस्तावावर पुढील कार्यवाही करण्यात आली आहे.