पुणे (प्रतिनिधी) : भोसरी येथील भूखंड प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर पुराव्यांची अधिक जुळवाजुळव करण्यासाठी व खटल्यासंबंधी कागदपत्रे मिळवण्यासाठी त्यांनी अॅड. असिम सरोदे यांच्या कार्यालयाला भेट दिली. परंतु, माध्यम प्रतिनिधींना त्यांच्या कार्यालयाबाहेर पाहून ईडीने पाठविलेला प्रतिनिधी कार्यालयात आला. मात्र नाराजी व्यक्त करत कागदपत्रे न घेताच बाहेर निघून गेला होता. ईडीने सांगितल्यानुसार सरोदे यांनी कागदपत्राच्या झेरॉक्स काढून ठेवल्या असताना त्याचे १ हजार, ३४० रुपये ईडीने दिले नाहीत. त्यामुळे अॅड. सरोदे यांनी ईडीलाच नोटीस बजावली आहे.

तक्रादार अंजली दमानिया यांचे वकील अॅड. असीम सरोदे यांना ईडीच्या कार्यालयातून ई-मेल आणि फोन आला होता. त्यांना ईडीने खडसे यांच्या विरोधातील न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणाची कागदपत्रे व  माहिती मागितली होती. त्यानुसार अॅड. सरोदे यांनी ईडीच्या मागणीला सहमती दर्शवत कागदपत्रे देण्याचे मान्य केले होते. परंतु, झेरॉक्सचा खर्च ईडीने द्यावा, असे त्यांनी त्यांच्या ईमेलमध्ये म्हटले होते. तसेच ईडीचे अधिकारी राजेश कुमार यांना ईमेलद्वारे उत्तर देताना त्यांना ईडी ही देशातील आर्थिक गुन्ह्यांचा तपास करणारी मोठी यंत्रणा आहे. परंतु, राजकीय पक्ष ईडीचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करत असल्याची नाराजी अॅड. सरोदे यांनी व्यक्त केली.