अखेर कासारवाडी येथील गायरान जमिनीची मोजणी सुरु…(व्हिडिओ)

0
746

टोप (प्रतिनिधी) :  गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्थ असलेल्या कासारवाडी इथल्या गायरान गट नंबर ६३०/१/अ मधील १२३ – ८५ हेक्टर क्षेत्राची मोजणी आज (सोमवार) झाली. ती मोजणी करुन अखेर वन विभागान हद्दी कायम करण्यास आज सुरवात केली आहे.

हातकणंगले तालुक्यातील मौजे कासारवाडी इथल्या गायरान गट क्र. ६३०/१/अ जमिनीचा ताबा देण्याबाबत हातकणंगले तहसील कार्यालयाने वनपरिक्षेत्र विभाग करवीर यांना दि. ४ फेब्रुवारी रोजी लेखी कळवले होते. कासारवाडी गायरानचा विषय गेली अनेक वर्ष वादग्रस्त होता. यावर अनेक वेळा तक्रारी, पाहणी होऊन मंत्रालयापर्यंत ही बाब गेलेली होती. गेल्या कांही दिवसात कासारवाडी गायरान मधील होणाऱ्या बेकायदेशीर उत्खननाबाबत कासारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने हरित लवादाकडे तक्रार दाखल केली होती. २० नोव्हेंबर १९५३ रोजी या गायरानातील जमिन संरक्षित वन अधिसूचित झालेले आहे. यामुळे गायरानातील क्षेत्र त्वरित वनविभागाकडे जाणार असल्याने महसूल आणि  वन विभाग यांनी संयुक्तपणे अंतिम हद्दीची जीपीएसद्वारे पाहणी केली. तसेच हद्दी कायम करुन तिथे मार्कींग करण्यात आले आहे.

करवीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. सोनवले, पेठवडगाव मंडळ अधिकारी गणेश बर्गे, टोप तलाठी जे.व्ही. चौगुले, भुमिअभिलेकेचे उमेश कुरडे, राहुल पाटील, शिरोली पोलिस स्टेशनचे सपोनि किरण भोसले, उपसहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल लोखंडे, कोतवाल सचिन कांबळे यांच्यासह वन विभागाचे वनपाल, वनरक्षक, वनमजूर उपस्थीत होते. यावेळी याठिकाणी कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणुन मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.