मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. आता या प्रकरणी दिग्दर्शक ऋषिकेश पवार याला एनसीबीने आज (बुधवार) ताब्यात घेतले आहे. एनसीबीने सुशांतसिंहच्या मृत्युप्रकरणाचा तपास पुन्हा एकदा सुरू केला आहे.

ऋषिकेश पवार याच्यावर सुशांतला ड्रग्ज पुरवत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला काही दिवसांपासून एनसीबीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. मात्र, अनेकवेळा नोटीस पाठवून देखील ऋषिकेश चौकशीसाठी येत नव्हता. अखेर एनसीबीच्या पथकाने ऋषिकेशच्या चेंबूरच्या घरी जाऊन त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ऋषिकेश घरी आढळून आला नाही. त्यामुळे  एनसीबीने त्याला फरार म्हणून घोषीत केले होते. अखेर आज पोलिसांनी ऋषिकेशचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे. सुशांतचा ड्रग्जशी नेमका काय संबंध होता, यासाठीच एनसीबीने ऋषिकेशला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अनेक नामांकित व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये बॅालिवूडमधील कलाकारांना ड्रग्ज पुरवणाऱ्यांमधील काही कलाकारांची देखील एनसीबीकडून चौकशी करण्यात आली होती.