कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऊस गळीत हंगामात तोडणी मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन ट्रॅक्टर मालकांसह ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आ. ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऊस वाहतूकदार शिष्टमंडळातर्फे करण्यात आली. जिल्हा पोलीसप्रमुख शैलेश बलकवडे यांना आज (शुक्रवार) याबाबतचे निवेदन देण्यात आले. शैलेश बलकवडे यांनी यापुढे अशा मुकादमांविरोधात वाहतूकदारांनी तक्रारी द्याव्यात, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.

निवेदनात म्हटलं आहे की, गळीत हंगामात कारखान्यांना ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टरवर ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून बुलडाणा, विदर्भ, मराठवाडा परिसरातील अनेक मुकादम ऊस वाहतूकदार मालकांकडून लाखो रुपये घेतात. मात्र ऊसतोड मजूर पुरवत नाहीत. दरवर्षी ऊसतोडणी कामगारांच्या मुकादमाकडून लाखो रुपयांची दरवर्षी फसवणूक केली जात आहे. मागील पाच ते सहा वर्षांत अनेक ऊस वाहतूकदारांना याचा लाखो रुपयांचा भुर्दंड बसला आहे. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हा दाखल करावा.

या वेळी एस. वाय. किल्लेदार, मारुती पाटील, अविनाश पाटील, दिगंबर पाटील, अनिल माने, युवराज पाटील, अमित पाटील, बाबासाहेब गोते, नितीन सूर्यवंशी उपस्थित होते.