पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या शेकडो एकर जमिनींपैकी ११७ एकर जमीन मंदिर समितीने परत मिळवली आहे. परंतु सर्व जमीन  परत मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहोत, असे हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी म्हटले आहे.

घनवट म्हणाले की, २०१४ मध्ये हिंदू विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून हिंदू जनजागृती समितीने श्री विठ्ठल मंदिराच्या १२५० एकर भूमी घोटाळ्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने देवस्थानच्या जमिनी शोधण्याचे आदेश दिले होते. याचा परिणाम म्हणून यापूर्वी देवस्थान समितीला ९०० एकर भूमी परत मिळाली होती आणि आता ११७ एकर भूमी परत मिळाली आहे. आतापर्यंत १०१७ एकर भूमी परत मिळवण्यात यश आले आहे.

मंदिर समितीला भाविकांनी आजवर अडीच हजार एकर पेक्षा अधिक जमीन अर्पण केली आहे. यातील अद्याप १४०० एकर जमीन परत मिळवता आलेली नाही. मुळात इतकी वर्षे या जमिनी ताब्यात घेण्याचे काम मंदिर समितीने स्वतःहून का केले नाही ? मंदिरांचे व्यवस्थापन चांगले करण्याच्या नावाखाली मंदिरांचे सरकारीकरण करायचे आणि इथेही सरकारी पद्धतीने भ्रष्टाचार करायचा, हे अत्यंत गंभीर आहे. हा मंदिरांचे सरकारीकरण केल्याचा दुष्परिणाम आहे, असे घनवट यांनी म्हटले आहे.