मुंबई (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरूण लाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. तर औरंगाबाद विभागातून सतिश चव्हाण यांना तिकीट देण्यात आले आहे.

पुणे पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने सांगलीतील संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. तर लाड हे सांगलीतील कुंडल गावाचे आहेत. त्यामुळे दोन सांगलीकरांमध्येच तुल्यबळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लाड यांनी २०१४ च्या निवडणुकीत बंडखोरी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सारंग पाटील यांचा निसटता पराभव झाला होता. दरम्यान आता लाड यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लाड यांचा विजय निश्चित असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, पुणे पदवीधर निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांनी बुधवारी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.