कळे  (प्रतिनिधी) :  शेतात पाणी सोडल्याच्या कारणावरून नवलेवाडी ( ता.पन्हाळा) येथील शिवारात दोन भावामध्ये  मारामारी होऊन एकजण जखमी झाला. पांडुरंग बापू पाटणकर (वय ५२,  मल्हारपेठ, ता.पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. याबाबत कळे पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या.

मल्हारपेठ येथील पाटणकर कुटुंबियांची नवलेवाडी गावच्या हद्दीत नदीकडे जाणाऱ्या वाटेवर पट्टी नावाची शेती आहे. शेतीचे क्षेत्र सखल भागात असल्याने आजुबाजूचे पाणी त्यांच्या शेतात तुंबते. त्यामुळे पाणी निचरा होण्यासाठी सुनील बापू पाटणकर (वय ४८) यांच्या शेतातून चर खोदलेली आहे. चर मुजली असल्याने पाण्याचा निचरा होत नाही.

दरम्यान,  त्यांचे चुलत भाऊ पांडुरंग बापू पाटणकर यांनी ऊस लागण केली आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने ऊस उगवण व उत्पादनावर परिणाम होऊन नुकसान होत आहे. त्यामुळे तू  चर का मुजवलीस, अशी सुनीलकडे विचारणा केली असता त्याने खुरप्याने वार करून जखमी केले. याबाबत सुनीलवर गुन्हा नोंद झाला. अधिक तपास पोलिस नाईक एस.एन. भोसले करत आहेत.

तर पांडुरंगने लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद सुनील पाटणकर यांनी दिली. याबाबत अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश मालवदे करत आहेत.