कोल्हापूर (प्रतिनिधी): नाबार्डकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्हयातील दुर्गम भागांतील खातेदारांना बॅंकिंग व एटीएम सुविधा देण्यासाठी तीन मोबाईल व्हॅनकरिता ४५ लाख तसेच बॅंकेच्या ग्राहकांना पुरविलेल्या रुपे डेबिट कार्ड सुविधेपोटी १२ लाख असे एकूण ५७ लाखाचे नाबार्डकडून अर्थसहाय्य जमा झाले, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी दिली.

ते म्हणाले, नाबार्डकडून कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम गावे व वाड्या-वस्त्यांवर तसेच शाखा नसलेल्या गावांमधून बँकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी मोबाईल व्हॅन करिता बॅंकेस अर्थसहाय्य मिळाले आहे. जिल्हा बॅंक तंत्रज्ञानामध्ये आघाडीवर आहे. गाव तेथे बॅंकेची शाखा या धर्तीवर मायक्रो एटीएम सुविधा कार्यान्वित केले जात आहे. याकरिता जिल्ह्यातील दुर्गम गावे व वाड्या, वस्त्यांमध्ये ५०० मायक्रो एटीएमद्वारे ग्राहकांना बॅंकिंग सुविधा पुरविली जाणार आहे. याकरिता नाबार्डकडून 300 मायक्रो एटीएमसाठी ६७ लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. लवकरच मायक्रो एटीएम सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे.